भजनी मालिका

भजने

अखंड जया तुझी प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥ पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाहीं गेला ॥१॥ मान अपमान वाढविसी हेवा । दिवस असतां दिवा हातीं घेसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥ सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥१॥ जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें । धन वित्तही वंचिले । तयां विठठलें सन्मानिजे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी । आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥ हाचि मानिला निर्धार । आतां न करी वाउगा विचार । वायां काय बा करकर । धरोनी धीर बैसलों ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥ विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध ॥१॥ जनीं वनीं जनार्दन । नाढळें त्या भिन्नाभिन्न । एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठठलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा