भजनी मालिका

भजने

उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥ पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा ॥ सवें मिळालें चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उठोनि प्रातःकाळीं ओढितां काचोळीं । जातो वेळोवेळीं महाद्वारीं ॥१॥ अहो जी दातारा विनवी अवधारा । तुम्हीं यावें घरां भोजनासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठोनि प्रातःकाळीं म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारीं । शिदोरी घेउनि वेगीं जाय रानीं ॥१॥ यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥ नेउल जालें सेवका स्वामींचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उठोनियां प्रात:काळीं । तुळस वंदावी माउली । तुळस संतांची साउली । मुगुटीं वाहिली विष्णूनें ॥१॥ तुळस असे ज्याचे द्वारीं । लक्ष्मी वसे त्याचे घरीं । येवोनी श्रीहरि । क्रिडा करी स्वानंदें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मारी ॥१॥ पाहो नेदी कांही धंदा । लावियेलें आपुल्या छंदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उठोनी प्रात:काळीं गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां ॥१॥ चला जाऊं आतां पाहूं गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥ नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उणें पुरें बोलिलों आधीं । तें आपुलिये बुध्दि सारिखें ॥१॥ तुम्ही तो देवा कृपामूर्ती । सकळां आर्ती पुरवितां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उतरला तळीं टाकियेली शय्या । स्नान केलें तया शीतोदकें ॥१॥ बैसे घालोनियां तृणाचें आसन । सारी नित्य नेम यथाविधी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥ बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा