भजनी मालिका

भजने

माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥ इच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंतले हो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिया पितयाची होईल निद्राभंग । न घडे प्रसंग बोलायाचा ॥१॥ क्षण एक मौन धरूनियां रहा । शरणागत पहा कृपादृष्टी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझिया बापाचा तुजपाशीं ठेवा । विठो म्हणे द्यावा केशीराजा ॥१॥ ठेविलें ठेवणें झडकरी देईं । नेव्हार कांहीं लावूं नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझिया बापाची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपास पारणें राखें दारवंटा । केला भाग्य वांटा आम्हांलागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझिया बापासी तुझाचि विश्वास । म्हणवी तुझा दास अंतरंग ॥१॥ वृत्तिसहित मन ठेवुनी तुझ्यापाय़ीं । तुजपरतें कांहीं जाणेचिना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझिया भावाचें खंडण । नव्हे ऐसें करा दान । मुखी नाम तुमचें स्‍मरण । राहो चरणावरीं दृष्टी ॥१॥ आणखी मी न मागें कांहीं । वसो प्रेम तुमच्या ठायीं । करुनि कृपा आठव देई । आवडी कीर्तनीं सर्वदां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥ पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिया मनाचें हिंडणें जे जे ठायीं । तेथें तेथें राही पांडुरंगा ॥१॥ भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी । दावीं दृष्टीभरी निरंतर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनियां देवो दत्तराव ॥१॥ फिटला संकल्प तुटली वासना । आन नाहीं कल्पना दुजी कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझिया मनें धरिला विश्वास । तुमच्या नामीं घातली कास । नाहीं उपेक्षा आणि आळस । तुमच्या ठायीं शरणांगत ॥१॥ बहुतां सांभाळिलें देवा । केला बहुतांचा कुडावा । बहुतां दानें वाढल्या सेवा । बहुतां स्थपिलें निजपदीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिया मनें मज उपदेश केला । तो मज बिंबला ह्लदयकमळीं ॥१॥ निर्वाणींची एक सांगितली खून । कैवल्य चरण केशवाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एका संपादिसी । मान करिसी येकाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥ आवडे ज्या हरी अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणे तें ॥१॥ सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला ॥१॥ भरोनियां मना बुध्दी । राहिला संधीं इंद्रियांच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा