भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें

majhiya mipanavar padon pashan | jalo hen bhushan nam majhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥ काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख । नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळा माझें मुख ॥ध्रु.॥ काया वाचा मनें अघटित करणें । चर्मचक्षु हात पाय । निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥ लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद । पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥३॥ आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन । भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट शब्द हीन ॥४॥ संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचारें वृद्धि पापा । तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥