भजनी मालिका

भजने

नामाचें धारक विष्णुरुप देख । त्रिभुवनीचें सुख तये ठायीं ॥१॥ ब्रह्मा विष्णु हर येताती सामोरे । नामधारक निर्धारे तया वंद्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते ॥१॥ नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वायां जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचें महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी ॥१॥ पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन नामें जाहला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचें लेखन श्वानाचिये कानीं । धांवतसे घाणी चर्माचिये ॥१॥ विंचू ह्मणतसे मी उदार दाता । उचित हें देतां नलगे वेळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचें सामर्थ्य नेणें वेदशास्त्र । शेषाचीं वक्त्रें मौनावलीं ॥१॥ गंगा गणपति चंद्र सूर्य श्रेष्ठ । शंकर वरिष्ठ मौनावले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥ तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नामाच्या उच्चारें प्रल्हाद तारिला । अजामेळ गणिकेचा उद्धार केला ॥१॥ तें नाम सोपें श्रीरामाचें । निरंतर वाचे जप करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । ऐसेम बोले वाणी वेदशास्त्रीं ॥१॥ पहा विचारोनि अनुभव तो मनीं । नका आडरानीं झणीं भरो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामापाठ माधव सदा तूं उच्चारी । माधव अंतरीं धरुनी राहे ॥१। माधवा माधवा आठवी यादवा । आणिक धांवा धांवा करुं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामापाशीं तिष्ठे देव । नामापाशीं वसे भाव । नामापाशी मुक्ति गौरव । अहर्निशीं वसतसे ॥१॥ नामापाशी ऋद्धिसिद्ध । नामापाशीं ते समाधी । नामें तुटती उपाधी । जन्मोजन्मीच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामापाशीं भुक्ति मुक्ति । ज्ञान विरक्ति हरिनामीं ॥१॥ नामापाशर दयाशांति । साधना समाप्ति हरिनामीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नामामृत गोडी आहे वैष्णवासी । येरां प्राकृतासी कळेनाची ॥१॥ प्राकृत हे जन भुलले विषयीं । नामाचिया गांवी कैसे जाती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग जैसें ॥१॥ प्राकृत हे जन भुललें विषया । नामाविण वांया जाती देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामामृत सरिता चरणामृत माता । पवित्र हरिकथा मुगुट आणि ॥१॥ तेथें माझें मन होकां क्षेत्रवासी । राहेम संतांपाशीं सुख घेतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामीं धरा दृढ विश्वास । घाला कळिकाळावर फास । नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण ॥१॥ सोपें वर्म कलिमाजीं । नामें तरती जन सहजीं । योगयाग तप साधनें जीं । तया प्राप्ती नामेंची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ