भजनी मालिका

भजने

गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ ते देखाव्य हरी । मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनी परस्परी वो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाई गोपांसमवेत गोकुळिंहुन आला । पाहुनि भक्तिं भुलला वैष्णवाला ॥१॥ मुगुटमनी धन्य पंडलिक नेका । तयालागीं देखा उभा गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गाई चारी कान्होबा । गोपाळ सांगाती उभा । अनुपम्य त्याची शोभा । नाचती प्रेमानंदें । गाताती भोगिता छंदे । मन वेधिलें परमानंदें रे कान्होबा ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गाई राखतां दिससी साना । तैं म्हणों यशादेचा कान्हा ॥ आतां न मानिसी अवघ्या गगना ।तुं ना कळसी ध्यानामना रे कान्होबा ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥ रंगलें हें चित्त माझें तया पायीं । म्हणउनि घेई हाचि लाहो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गाईन कीर्तनीं गुण नाम पवाडे । तुमचे तुम्हां पुढे आवडीनें ॥१॥ भावा ऐसे माझया व्हा जी पांडुरंगा । मग मी आलें भागा करीन तें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥ चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाऊं तरी एक विठ्ठलाचि गाऊं । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥ पाहूं तरी एक विठ्ठलचि पाहूं । आणिकां न गोवुं वासनाही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गाऊं नाचू विठो तुज तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥ आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणें हरी ॥१॥ माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥ ब्रम्हांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥ बळियाचा बळी वो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाजी परमानंदु मानसीं । संत भेटतां सुखराशी । कीर्तनें तारिलें सर्वांसी । विठ्ठल नामस्मरणें ॥१॥ धन्य धन्य विठ्ठल मंत्र । सोपा तीन अक्षरीं पवित्र । काळिकाळ उघडोनि नेत्र । पाहूं न शके जयासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गांठीं बांधोनियां धन मिरविती भक्ति । मनीं ते आसक्ती अधिक व्हावी ॥१॥ चित्तवित्ता वरी भक्ति लोकाचारीं । देव अभ्यंतरी केवीं भेटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गाठीं बांधोनियां धना । क्षणाक्षणा पाहे त्यातें ॥१॥ न जाय तीर्थयात्रेप्रती । धनाशा चित्तीं धरूनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥ नाठेळाची भक्ती कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥ त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम