भजनी मालिका
← भजनांकडे परत

याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य

yati shudra vaish kela vevasav | adhi to ha dev kulapujya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥ नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥ संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥ लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥ आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥ कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥ संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥ टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनी ॥१०॥ वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥ सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ मनी ॥१३॥ यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥ निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥ बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥ आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥