भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरीजन । तया नारायण समागमें

vaikunthichya lokan durlabh harijan | taya narayan samagamen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरीजन । तया नारायण समागमें ॥१॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तवत्ते समर्पिलें ॥२॥ समर्थ तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥ रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाईं चारी ॥४॥ गाईं चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीते ॥५॥ काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाईं पशु ॥६॥ सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरी ॥७॥ धणीवरी त्यांसी सांगितली मात । ज्याचे जैसे आर्त तयापरी ॥८॥ परी याचि तुम्ही आइका नवल । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥ शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥ तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥ हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥ तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥