भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज न भें भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा

tuj na bhen bhi kalikala | maj namacha jivhala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज न भें भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥ माझा बळीया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥ शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥ कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥ वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥ हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥ वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य॥६॥ छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥ शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥ मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥ पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥ गजेंद्र स्मरे राम राम। त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥ तुका म्हणे हरीरूप जाले । पुन्हा नाहीं जन्मा आले ॥१२॥