भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वयें सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव

svayen sukhache jhale anubhav | ek ekipashin sangatil bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वयें सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥ आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल । एका मेघःशामें जळधर वोल । रसीं उतावळि हृदय सखोल वो ॥ध्रु.॥ एक विषय तो सकळांचा हरी । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं । अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥ स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर । परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥३॥ भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी । दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरी वो ॥४॥ तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून । पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥५॥