भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख

sundar angakanti mukhen bhal surekh | banali uti angin tila sajira rekh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥ जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥ उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति म्हणती तयां न कळे गति । भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न कळे गति ॥२॥ ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती। बोडके नग्न एक निराहार इती । साधनें योग नाना तपें दारुण किती। सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥ भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक। कामिनी मनमोहना रूप नाम अनेक । नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥ उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । त्तवासि त्तवसार मूळ जालासी बीज । खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥५॥