भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें

pundalik bhaktaraj | tenen sadhiyelen kaj | vaikunthinchen nij | parabramha anilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥ पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥ एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । म्हणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती ॥२॥ पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि- ।- निषेधाची वसति ॥३॥ पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । न बुडे हे कल्पांतीं ॥४॥ अनुपम्य इची थोरी । महाक्षेत्र हें पंढरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ॥५॥