भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां

pashan phutati ten duhkh dekhoni | karitan gaulani shok lokan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥ काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥ एकांचिये डोळां असुं बाह्यात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥ जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥४॥ निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥ त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥ वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरीसवें ॥७॥ सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥८॥ नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥ सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥ तिरीं माना घालूनियां उभ्या गाईं । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥ यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥ यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥ मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥१४॥