भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांगुळ झालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय

pangul jhalon deva nahin hat na pay | baisalon jayavari sairat ten jay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पांगुळ झालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥ दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥ हिंडतां गव्हानें गा । शिणलों येरझारी । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी । कीर्ति हे संतां मुखीं । तोचि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥ या पोटाकारणें गा । झालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा । पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥ काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं । मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥ दुरोनि आलों मी गा । दुःख झालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण । दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं झालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥