भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया

panduranga karun pratham naman | dusaren charana santanchiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥ त्याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्गुरुदास तुका ॥२॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥ या मनासी लागो हरीनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥ सीण झाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें झाली काया ॥५॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥ नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥ तांतडी ते काय हरीगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥ मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥ दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥ हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥ जाणतयांनीं सांगितलें करा । अहंतेसी वारा आडूनियां ॥१२॥ यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥ नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥ चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥ जाणते नेणते करा हरीकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥ माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥ कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥ नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥ लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट झाडी ॥२०॥ डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥ जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥ माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥ हाचि माझा नेम हाचि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥ चेतवला अग्नि तापत्रयजाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥ मना धीर करीं दृढ चिता धरीं । तारील श्रीहरी मायबाप ॥२६॥ बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥ त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥ भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥ मात त्याची सदा आवडे जयासी । तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥ यावें विष्णुदासीं तरीच गर्भवासीं । उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥ होती आवडत जीवाचे ताइत । त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥ भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥ वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥ संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥ लाभ तयां झाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥ लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥ विसरलीं तयां थोर झाली हाणी । पचविल्या खाणी चौऱ्यांशीसी ॥३८॥ शिकविता तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥ गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नाशिवंत ॥४०॥ तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥ या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकिराज्य ॥४२॥ जेणें अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥ तहान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥ नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥ याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥ कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण ॥४७॥ विनवितां दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥ धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग देवा तयांसी नाहीं ॥४९॥ नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥ त्याची च उच्छिष्ट बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥ व्यासें सांगितलें भक्ति हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥ तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥ तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्ति उत्तरें ऋषीचिया ॥५४॥ यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥ तान्हेलें भुकेलें म्हणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥ जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥ धांवे सवेतान्ही धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥ नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥ पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामराम ॥६०॥ रामराम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥ उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥ मरणाचे अंतीं राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥ तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥ सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥ कोठें नका पाहों करा हरीकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥ सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥ नाहीं भक्ती भली केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥ नागवलों म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥ तोचि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥ खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥ ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥ वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठके ॥७३॥ ठकला नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥ दास ठेले पोट अर्थ दंभासाठी । म्हणउनि तुटी देवासवें ॥७५॥ सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥ पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥ वादका निंदका देवाचें दर्शन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मा ॥७८॥ षडकर्मा हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥ देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥ मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥ युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥ बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्याच्या ॥८३॥ त्याच्या पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रम्हादिकां ॥८४॥ काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥ होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥ मायबापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें ॥८७॥ तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्वकाळीं ॥८८॥ सत्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥ सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥ कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्वगुणीं ॥९१॥ सत्वरजतमा आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥ चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥ सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तोचि एक ॥९४॥ एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आम्हां ॥९५॥ आम्हांसी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करूं ॥९६॥ करूं हरीकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नासे ॥९७॥ नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥ सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥ राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आंता ॥१००॥