भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां

mukhen sange tyansi pail chendu paha | udakant dohachiye mathan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥ जळांत पाहातां हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥ नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥४॥ वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । म्हणती गोपाळा आतां कैसें ॥५॥ कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥ डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥ जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरी ॥८॥ त्यासि नारायण म्हणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥ वरी जातां वरी पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणों ॥१०॥ नेणों म्हणती हें करितोसि काईं । आम्हां तुझी आईं देईल सिव्या ॥११॥ आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥ निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥ खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥ तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥