भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा

kon amhan puse sinalen bhagalen | tujavin ugalen panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥ कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥२॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥३॥ कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥४॥ तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥५॥