भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ते विरक्ती न कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या

kay te virakti na kale amhan | janon eka nama vithobachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय ते विरक्ती न कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥ नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळीं आनंदें या ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया ते मी काय जाणें । विठ्ठलकीर्तनें वांचूनियां ॥२॥ कासया एकांत सेवूं तया वना । आनंदे या जनामाजी असे ॥३॥ कासया उदास होऊ देहावरी । अमृतसागरीं बुडोनिया ॥४॥ तुका म्हणे मज असे हा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥