भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया

jagacha ha bap dakhavilen maye | mati khatan jaye maravaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥ मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥ देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तियेपुढे ॥३॥ पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥४॥ मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें म्हणे देवा बाळ ॥५॥ बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥ गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥ न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥ सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥ तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥ दुणी झालें त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनियां ॥११॥ आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥ मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥१३॥ लेंकरूं आमचें म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तोचि भाव ॥१४॥ भाव जाणावया चरित्र दाखवी । घुसळितां रवी डेरियांत ॥१५॥ डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥ हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥ सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥ यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥१९॥ त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥२०॥ नेदी राहों भाव लोभिकांचे चित्ती । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥२१॥ अंधळीं तीं तुका म्हणे संवसारीं । जिहीं नाहीं हरी ओळखिला ॥२२॥