भजनी मालिका
← भजनांकडे परत

गातों वासुदेव मीं ऐका

gaton vasudev min aika

गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥ अल्प आयुष्य मानवी देह । शत गणिलें ते अर्ध रात्र खाय । मध्ये बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥ क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा । न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥ कांहीं थोडा बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥ विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां । दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥