भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे

eke ghai khelatan na padasi dai | duchalyane thakasil bhai re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोई रे ॥१॥ खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे । तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ध्रु.॥ सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई । तेणें सतत फड जागविला रे । एक घाई खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥२॥ ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदे खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला । आपण भोवती नाचती रे । सकळीका मिळोनी एकची घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायी रे ॥३॥ राम बसवंत कबीर खेळीया । जोड बरवा मिळाला रे । पाचा सावन्ग्दिया एकची घाई । तेथे नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिलोनियां त्यांनी । तो हि खेळीया निवडीला रे ॥४॥ ब्राम्हणाच पोर खेळीया ऐका भला । तेणे जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करुनिया तेणे वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एकची घाई खेळता खेळता । आपणची बसवंत जाला रे ॥५॥ आणिक खेलीये होऊनिया गेले । वर्णावया वाचा मज नही रे । तुका म्हणे गडे हो हुशारुनी खेळा । पुढिलांची धरुनिया सोई रे । एकची घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥६॥