भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें

chinta te palali gokulabaheri | pravesh bhitari kela deven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥ आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥ करावया भक्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥ गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥ घरोघरीं झाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥ आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥ लोकां गोकुळींच्या झालें ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥ जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥ केलीं नारायणें आपुलीं अंकित । तोचि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥ सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥ नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥ याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥१३॥