भजनी मालिका
← भजनांकडे परत

चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या

chari ved jyachi kirti vakhaniti | bandhavi to hatin gaulanichya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥ गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥ तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥३॥ माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥ जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । म्हणउनि चोरी नसांपडे ॥५॥ नसांपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥ वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥ निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥ न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥ भाविका तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती नसांपडे ॥१०॥ नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका म्हणें भावें चाड एका ॥११॥