भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवचिता त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला

avachita tyannin dekhila bhujang | palatil mag hau ala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवचिता त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥ आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो हरी गडियांसि ॥२॥ गडियांसि म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशीं ॥३॥ मजपाशीं तुम्हां भय काय करी । जवळि या दुरी जाऊं नका ॥४॥ कानीं आइकिले गोविंदाचे बोल । म्हणती नवल चला पाहों ॥५॥ पाहों आले हरीजवळी सकळ । गोविंदें गोपाळ आळिंगिले ॥६॥ आल्या गाईं वरी घालितील माना । वोसरलें स्तना क्षीर लोटें ॥७॥ लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥८॥ कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥९॥ त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥१०॥ याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥११॥ दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश । तुका म्हणे आस निरसली ॥१२॥