भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया

anik kanhin ya uttarachen kaj | nahin atan maj bolavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥ भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥ गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥२॥ तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥३॥ तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हे चि धणी ॥४॥