भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल

aika santajan uttaren majhe bobade bol | karin lad tumhampudhen ho koni jhani kopal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥ उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावें चित्तीं ॥ध्रु.॥ धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥२॥ पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥३॥ लाभ तयासी झाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥ सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥ साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥ मान पावे तो आगळा मुख्य इंद्रियें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे॥६॥ जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥ भला तोचि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥ आचारी अन्न काढी रे गाई अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥१०॥ स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें झालें रे आणी अहंभाव ॥११॥ धन्य जन्मा ते चि आले रे एक हरीचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥ जोहोरि तोचि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥१३॥ बिळयाढा तोचि जाणा रे भक्ती दृढ शरीरीं । गांढ्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥ खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे म्हणे होईल कैसें ॥१५॥ उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिठाई ॥१६॥ चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥१७॥ गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौऱ्यांशी जन्म ॥१८॥ तुका म्हणे मना घरी रे संतसंगतिसोई । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥१९॥