भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज पासाव जन्मलों हरी पुढती सामावलों तुझ्या उदरीं

tuj pasav janmalon hari pudhati samavalon tujhya udarin

तुज पासाव जन्मलों हरी पुढती सामावलों तुझ्या उदरीं । तुझिया व्यापकपणें चाले सत्कर्माची दोरी । सायीखडियाचें बाहुलें कैसें हावभाव धरी । सूर्यकांत वेधें अग्नीच प्रसवे सहजे समंधु ऐसा धरी रया ॥१॥ तुझें तुज देवा सांगता निकें । समर्थेसि केवी बोलावें रंकें ॥ध्रु०॥ अहंकार महदादि भूतें गुणेंसि आलीं । तें चैतन्यनयनीं अधिष्ठिलीं । सर्व शरिरीं वायो व्यापिला कीं पृथ्वींसि मिळोनि आकाशा भरोवरी जाली । ते हे स्थूळ लिंग कारण तिहीं तत्त्वेंसी प्रकृति अथिली रया ॥२॥ सर्व होणें तुज एकाचें । दुजेपण तेथें आणावें कैचे ॥ध्रु०॥ चंद्रमा मन चक्षुसूर्योदिशा श्रोत्र आकार उकार मकार प्रणव मन बुध्दि चित्त अहंकार । ब्रह्मा विष्णु महेश राजस तामस सात्विक माया ब्रह्मीचा दावि पाड पावो तुज वेगळे काय आहे तें सांग पां तरि मज कां म्हणवितासि जिऊ रया ॥३॥ जेथें पाहें तेथें तूंचि दिससी । लपोनिया अबोला कासया धरिसी ॥ध्रु०॥ रसना रस सेवावें हे तो जीव आत्म्याची स्थिति । श्रवणीं ऐकणें की नेत्री देखणें हे तो तुझीच नाद श्रुती । घ्राणासि परिमळ घेणें कीं हस्तपादाचि कां चरगती । हे तो तुझींच पांचै तत्त्वें तरीं तूं मज कां भोगावितांसि यातायाती रया ॥४॥ लाजेसि ना तूं देवा माझें ह्मणतां । संन्यासावें कैंचीरे कांता ॥ध्रु०॥ इंद्रियें दारुणे जीव आत्मयासी कैंचीरे कांता ॥ध्रु०॥ इंद्रिकें दारुणे जीव आत्मयासी हे तो सुखदु:ख प्राप्ती । तेणें हें कारण कीं आत्मा पाव यातायाती । इंद्रियें दंडून तप जें करावें ऐसें बोलती वेद श्रुती । साहीजणासि तो वेवाद लाविला हे तो तुझीच करणी सांगती रया ॥५॥ दुजेविंण एकला खेळतो स्वारी । कवणातें जय कवणा आली हरी ॥ध्रु०॥ अंगे ब्रह्मा जालासि उप्तत्ती करावया सृष्टी । ते समयीं तो रचिली विषयाची कसवटी । ऐसें तुझें वालभ मिरऊं जाय सृष्टि । तंव सुखदु:ख लागतसे पाठीं । येथें काय माझा अपराध जाणसी तरि शस्त्रेंसि मान निवटीं रया ॥६॥ सगुण रचना वोजा विस्तारली । भुजंगी व्याली तिची काय झालीं पिलीं ॥ध्रु०॥ वेद प्रमाण करावया कारण कीं कृष्णमूर्तिची बुंथी घेणें । अनंतब्रह्मादिकांसि आदिवंद्य तो तूं राखसी गौळियाची गोधनें । अंबऋषीकारणें गर्भवास साहिले कीं अजामिळादिकांसि उध्दारणें । वैरियां भक्तां येकिचि मुक्ती मा सम्रर्थु नाहीं येणें माने रया ॥७॥ अनंत ब्रह्मांडे घडिसी मोडिसी । अकर्तेपणें जैसा तैसा अससी ॥ध्रु०॥ एक विरा माया मारावी कीं गणिका उध्दारावी हे कवण प्रकृती । दशरथापिता रौरवीं कीं वैरिया सायुज्यता मुक्ती । कर्मभ्रष्ट पांडव सरते केले की अज्ञानासी मोक्षप्राप्ती । शास्त्रें पुराणें वारुं जाय तंव अधिकचि गुंती रया ॥८॥ सुताचें गुंडाळें उगवीं पा वहिलें । खंडूनियां सांडी देवा एकाचि बोले ॥ध्रु०॥ मिथ्या हा प्रपंच कीं दर्पणीचें दुजे जळीं बिंब प्रकाशे । एक साचें दुजें दिसें तैसेंचि । दुसरे का प्रतिभासे । लटिकें म्हणों जाय तंव तेथें मन का विश्वासे । सगुण निर्गुण हे तों तुझीच माया तुझी तुजमाजी दिसे रया ॥९॥ अर्धनारी सोंग पाहतां निकें । साच लपऊनि दावितो लटिकें ॥ध्रु०॥ सिध्दासी साधन हे तों कष्टचि वायांविण । अनंत प्रत्यक्ष जाणोन कायसें परिमाण । स्वयंभासि प्रतिष्ठा करणें हे तों देखतचि अज्ञानपण । निजबिंबामाजी प्रतिबिंब बिंबलें तैसें सगुण निर्गुण तुजमाजी रया ॥१०॥ सहजसिध्द तें तूं आपणपें पाहीं । बाहिजु भीतरी ये दोन्हीं नाहीं ॥ध्रु०॥ विश्वरुप अळंकारलें कीं मुसें आटली भांगारे । अथवा घटमटादिकीं अभावीं परिपूर्ण असिजे अंबरें । उदकी पडिला काश्मिरा तो नागवे निरा न सरे । दुसरेपणें तैसा आदि मध्य अंतीं ह्रदयींचा जाणोनि पूर्णबोधेंविण द्वैत न सरे रया ॥११॥ सच्चिदानंदरुप तत्त्वता । लटिकेंचि बंधन बंधना मुक्ता ॥ध्रु०॥ म्हणसी माझा संकल्प फळला तरि म्या दु:ख नाहीं इच्छिलें । अवघा तुझा खेळ बहुरुप असें विस्तारलें । जाणसीं तें करी देवातें तुझें तुज पुढां सांगितलें । तेथ काय माझा अपराध देखसी तरी देह कां खंडिले रया ॥१२॥ पुरे पुरे आतां जड जालें जिणें । उरी नाहीं देवा लाजिरवाणें ॥ध्रु०॥ ऐसीं इंद्रियें वासनेसी आणीजती ते तुझी तुजमाजीं सामावती । समस्त जीव हे तों तुझे आकारलें येरी ते लटकीच भ्रांती । जाणसी तें करी देवा तेचि तें सागों किती । दग्धबीज तरु बीजीं सामावला तैसा तुजमाजी श्रीगुरुनिवृत्ति रया ॥१३॥ ऐक्य जालें तेथें नित्य दिवाळी । सहज समाधि तेथें कायसिरे टाळि ॥ध्रु०॥