भजनी मालिका
← भजनांकडे परत

तापत्रयीं तापलीं गुरुतें गिवासिती

tapatrayin tapalin guruten givasiti

तापत्रयीं तापलीं गुरुतें गिवासिती भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी । तंव ते नेणोनि उपदेशाची रीति आना न उपदेशिती । ठकलें निश्चिती तैसें जालें ॥१॥ संत ते कोण संत ते कोण । हे जाणवि खुण केशवराजा ॥२॥ कोण्हीं एक प्राणी क्षुधेंने पिडिले । म्हणोनि दोडे तोडूं गेले । खावों बैसे तों नुसधि रुयी उडे । ठकले बापुडें तैसे झालें ॥३॥ कोण्ही एक प्राणी प्रवासें पीडिला । स्नेहाळु देखिला बिबवा तो । तयाचें स्नेह लावितां अंगी । सुजला सर्वांगी तैसें जालें ॥४॥ कोण्ही एक प्राणी पीडिला झडीं । म्हणोनि गेला पैल तो झाडी । खा खात अस्वली उठली लवडसवडीं । नाक कान तोडी तैसें जालें ॥५॥ ऐशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी । बापरखुमादेवीवर विठ्ठ्लीं भेटी । पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥