भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन । मतिविस्ताराचे महिमान स्फुर्ती फांकोन वाहावली

purvil katha anusandhan | rahilen hoten karitan kathan | mativistarache mahiman sphurti phankon vahavali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन । मतिविस्ताराचे महिमान स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥ माभळभट गेलीया वरी । कागासुर तो माव करी । येऊनियां गोकुळा भीतरी । बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥ म्हणे फोडूनियां दोन्ही डोळे । बाळका करीन मी आंधळे । चुंचचिघातें कंठनाळें । फोडीन वृक्षस्थळीं बैसोनी ॥३॥ काय करील तें लेकरुं । मनुष्य मानवी ते इतरु । आम्हां दैत्यांचा आहारु । कैसेनि येती ते मजपुढें ॥४॥ कंसाचिये आज्ञे भेणें । करितो मनुष्यांची संरक्षणें । आतां तों प्रेरिलेंसे तेणें । आड आलिया निवटीन ॥५॥ आलिया त्याचिया कैवारा । आकळूं झकें मी इंद्रादिसुरां । मज कोपलिया कृतातवीरा । कोण सामोरा येऊं शके ॥६॥ निळा म्हणे ऐशिया मदें । मातला मनेशींचि अनुवादें । कंसा तोषवीन आनंदे । प्रतीक्षा करी कृष्णाची ॥७॥