भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावले ब्राम्हण अलंकापुरासी । आनंदमानसीं न समाये तो

pavale bramhan alankapurasi | anandamanasin na samaye to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पावले ब्राम्हण अलंकापुरासी । आनंदमानसीं न समाये तो ॥१॥ देखिला दंडक्षेत्रवासी जन । प्रात:काळीं प्रश्न करिती तीर्थी ॥२॥ पूजूनि सिध्दासी नरनारी बाळें । जाताती राउळा आपुलाल्या ॥३॥ बाळलीळा वेषें आनंदें खेळती । नर नारी देखती येतां जातां ॥४॥ खालावुनी माथा श्रीमुख पाहती । आपुलाल्या जाती कामा लोक ॥५॥ देखोनियां ब्राम्हण मनीं विवारिती । येथें नमस्कारिती मार्गी कोणा ॥६॥ पुढें देखियेल्या खेळतां कुमारी । पुसती उच्चस्वरीं तयांप्रती । ॥७॥ निवृत्ति ज्ञानदेव वसताती कोठें । कोणीकडे मठ आहे त्यांचा ॥८॥ ऐकोनि कुमारी हिडसुनी धिक्कारी । बोट कानावरी ठेवूनियां ॥९॥ कोठील रे तुम्ही नेणां विनीतता । उध्दट बोलतां महामूर्ख ॥१०॥ अर्भकाच्या परी नामें उच्चारुनी । पुसतां महामुनी सिध्दराया ॥११॥ दीर्घस्वरें करिती नामाचा उच्चार । नेणोनियां पार महिमा त्यांचा ॥१२॥ गव्हाराच्या परी बोला सैरा शब्द । मूर्ख तुम्ही मुग्ध हीनबुध्दी ॥१३॥ व्यापकासी स्थान अपारासी मान । मानितां अज्ञान मूढमती ॥१४॥ ऐकावें स्वर्गीचे श्रीमंत गोसावी । नाटक लाघवी ब्रम्हांडाचे ॥१५॥ तया एकदेशी कल्पूनियां स्थान । पुसतां अज्ञान मठ त्यांचा ॥१६॥ तिहींलोकांवरी मिरवे ध्वज ज्यांचा । नेणां महिमा त्यांचा मतिमन ॥१७॥ अरे ब्रम्हादिकां पूज्य ईश्वर अवतार । बोलतां उत्तर अमर्यादें ॥१८॥ संज्ञामात्रें नेत्र खुणेनें दाविती । पहा ते खेळती नित्यमुक्त ॥१९॥ ज्ञानप्रभा दिनमणी ते उगवले । ते प्रत्यक्ष देखिले देव तिन्ही ॥२०॥ सहजाचें आसन आंगी योगकळा । देखियेली लीळा आत्मनिष्ठ ॥२१॥ देखतां लोटिले देह लोटांगणीं । लागले चरणीं अति नम्र ॥२२॥ म्हणती ज्ञानदेव चांगयापासून । आले हे ब्राम्हण समाचारा ॥२३॥ तें ऐकोनियां व्दिज म्हणती अंतर्निष्ठ । जाणीतलें स्पष्ट अंतरींचे ॥२४॥ यावरी सिध्दाइ्र असावी ते कैसी । सर्वांतरवासी देवचि हे ॥२५॥ लागोनियां चरणीं दिधली पत्रिका । सांगितलें निकें वर्तमान ॥२६॥ म्हणती चांगदेवें प्रणिपात केला । मस्तक ठेविला चरणांवरी ॥२७॥ पत्राचें उत्तर मागितलें स्वामी । भेटी अंतर्यामीं इच्छिताती ॥२८॥ म्हणती निवृत्तिनाथ वाचा ज्ञानेश्वरा । तंव ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥२९॥ कोरें पत्र बरें निवृत्ति बोलती । पाकाची निष्पत्ती होय तेथें ॥३०॥ कोरें ते सोंवळें खरकटें ओंवळें । धुतल्याही जळें शुध्द नोहे ॥३१॥ कोरें तें निर्मळ स्वीकारिलें जाय । अमंगळ राहे खरकटें तें ॥३२॥ कोरीया अक्षर उमटे कसोटी । रददी जाय हाटी विकावया ॥३३॥ एकाक्षर ब्रम्ह प्रणवाचे कुशीं । नुच्चारे पुरेशी उच्चारिता ॥३४॥ पाविजे अक्षर गुरुकृपा खुणे येराशी उमाणे नुकलवे ॥३५॥ शिणती बहुतें करितां खटपट । अर्थ उफराटा पडे तयां ॥३६॥ अक्षर परब्रम्ह वेदा अगोचर । कैंचा अनुस्वार उमटला ॥३७॥ न चले जाणीव न चले शाहाणीव । तुर्का नुरे ठाव अक्षर तें ॥३८॥ पत्र लिहा तुम्हीं कृपेचा प्रसंग सोरसें । अज्ञापिलें ऐसे निवृत्तिनाथें ॥३९॥ रेखियेली पत्रीं लिखिती पासष्टी । पाहतां अर्थ दृष्टीं तत्वी पडे ॥४०॥ परम गुह्या गुह्य उपनिषदीभाग । कृपेचा प्रसंग संपादिला ॥४१॥ वाचिलीया अर्थ अणितां मानसीं । पाकजे अनायसी परमतत्वा ॥४२॥ न करितां यजन अध्ययन अध्ययन । न करिता साधन आत्मप्राप्ती ॥४३॥ देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा । निरोरपर सांगावा विवराहे ॥४४॥ घेऊनियां पत्र निघाले ब्राम्हण । वंदिले चरण पुढतोपुढतीं ॥४५॥ आले तप्तीतीरा नमिलें सिध्दासी । वर्तमान त्यासी निरोपिलें ॥४६॥ म्हणती सिध्दराया पाहिला जी महिमा । आंगी निरुपमा सामर्थ्याचा ॥४७॥ अदभुत ऐश्वर्य देखिलें लोचनी । दिधलें लिहोनी पत्र तुम्हां ॥४८॥ देऊनियां पत्र म्हणती व्दिजवरा । देवाचे अवतार नि:संदेहें ॥४९॥ मग करुनियां पूजा पत्र वाचियेलें । तंव गुह्य देखिलें न चले युक्ती ॥५०॥ मग म्हणे अभिमान अदयापि न जाळे । तिमिरें गेले डोळे न दिसे हित ॥५१॥ कृत्रिम आचरणें दशा झाली ऐशी । विश्वास मानसीं थार नेदी ॥५२॥ ऐकतों श्रवणीं पहावें लोंचणी । निश्चय तो मनी दृढ केला ॥५३॥ अनुतापें उददेश धरिला चांगदेवें । अळंकापुरा जावें सिध्दा भेटी ॥५४॥ तरी सार्थक धरिलिया जन्माचें । नाहीं तरी काळाचें भातुकलें ॥५५॥ न चुकती जन्म चौर्‍यांयशी यातना । काळासी वंचना कोठवरी ॥५६॥ पाचारिले वर्स परिपत्य अधिकारी । सांगती तयारी करावी त्यां ॥५७॥ वहनें सामग्रीया सिध्द करा वेगीं । जाणे भेटीलागीं सिध्दाचिये ॥५८॥ कोठवळे जमादार आले पोतनीस । सरंजाम त्यांस आज्ञापिला ॥५९॥ ऐकोनियां सर्व गृहस्थ शिष्यवर्ग । धांविले सवेग आले जवळी ॥६०॥ म्हणती सिध्दराया परिसावी विनंती । जाणें तरी युक्ति ऐसें जावें ॥६१॥ प्रतापें महत्वें आपुल्या महिम्यानें । ऐश्वर्य भूषणें सिध्दाईच्या ॥६२॥ विदयेच्या सामथ्यें आपुलीया वैभवें । जाऊनि भेटावें बडिवारे ॥६३॥ आपणा देखोनि झांकेल त्यांचे तेज । येतील तेहि सहज शरण पायां ॥६४॥ तैसाचि योजिला युक्तीचा प्रसंग । विस्तारिलें सोंग बहुविध ॥६५॥ व्याघ्रावरी स्तंभनें सर्पासी मोहनें । सिध्द केलीं वहनें रथ वारु ॥६६॥ हाकारिला सर्व शिष्यसमुदाय । सांगितलें काय तयांप्रती ॥६७॥ बैसा व्याघ्रावरी सर्प धरा करीं । नाना अळंकारी जाऊ चला ॥६८॥ जाती चांगदेव भेटी समुदायें । महा महोत्साहें अलंकापुरा ॥६९॥ तप्तीतीराहूनि गृहस्थ अपार । सवें दळभार गजवारु ॥७०॥ कश्यप स्वामीचा फळला आशिर्वाद । राजश्रिया पद भोगप्राप्ती ॥७१॥ चालियेला राजे गृहस्थ मंडळी । केलीं विप्रकुळीं परस्थानें ॥७२॥ म्हणती सिध्दा भेटी होईल परस्परें । पाहों अत्यादरें उत्साह तो ॥७३॥ परिवारें सांगतीं घेतलीं स्त्रियाबाळें । व्यवसायीं पाठयाळ थोपटिली ॥७४॥ निघाला उदमि म्हणती सौदागर । भरियेले संभार गोणीयांचे ॥७५॥ हांशील जकाती न लगे चौकी देणें । लाभा नाहीं उणें पिकला कौल ॥७६॥ नटवे नृत्यांगना गुणिजनांचे भार । चालिले अपार समागमें ॥७७॥ ठाकूर नगारी गर्जती पवाडे । सवें चालती देव्हडे सिध्दापुढें ॥७८॥ गजावरी वादयें निशाणें कुसरी । द्रव्यें भरिल्या हारी गाडीयांच्या ॥७९॥ नरंमिन्याचीं दिंडें सवें शिकारखाना । राज्यभार सेना तैसा चालें ॥८०॥ डेरे कनातांचे लादियेले उंट । चालती संघाट काटीयांचे ॥८१॥ नौबनी नगारे वादयजात सकळ । घाषें तया भूगोल दुमदुमिला ॥८२॥ लक्षावत यात्रा तप्तीतीराहुनी । चालतां अवनी न पुरे मार्ग ॥८३॥ छबिने पताका मोरपिसा कुंचे । टाळ मृदंगांचे समारंभें ॥८४॥ शृंगारिला भेख विदयेच्या कुसरी । सोंगें नानापरी दर्शनाचीं ॥८५॥ सवारले शिष्य गुरु आज्ञेवरी । नाना वेषधारी बाह्यरंग ॥८६॥ चर्चियेलीं भस्में काशांबरवासी । मृग व्याघ्र चर्मासी संख्या नाहीं ॥८७॥ कडुक कुंडले शिरीं जटाभार । मुक्तकेशी दिगंबर नागवेचि ॥८८॥ जागवटे सैल्या फुलमाळा शोभती । कथा विराजती नानावर्ण ॥८९॥ झोळया बटवे कक्षेमाजी जडया बुटया । आडबंद लंगोटया बटूवस्त्रें ॥९०॥ कुबडया काठया छडया वेणूदंड हातीं । टोप विराजती कफणीया ॥९१॥ कुंडले सांगातें भांग घोटावया । चिलमी ओढाया गुडगुडया ॥९२॥ पक्ष्यांचे पिंजरे सांगाते कुतरे । चितळें सामरें सोकविलीं ॥९३॥ पांवे मोह्या चंग किन्नरी झल्लरी । डफ हुडुक करीं नागसरे ॥९५॥ गोरख छंदे हाती गोलाणें धनुष्यें । धांवति आवेशें विदयोचिया ॥९५॥ कुशळ कवि ते वाचाळ बोलते । बहुमतें झाकविते तर्कवादी ॥९६॥ फळें जळाहारी एक दुग्ध पिती । मौन्याचे व्रतस्थी पवनाभ्यासी ॥९७॥ व्याघ्रा आरोहणें रथाचीं वहनें । सर्पाचीं वेष्टणे नानाविध ॥९८॥ योगमुद्रा अंगी दाविती कसोटी । नाना लक्ष दृष्टी उफराटिया ॥९९॥ कलरवापरी अंजनें घालूनि नयनीं । दाविती लोचनीं तिमिर तेज ॥१००॥ भाविका नरनारी बाळा झकविती । हेंचि ब्रम्हा म्हणती तेजाकार ॥१॥ सत्याचा दुष्काळ असत्याची रुढी । दाविताती प्रौढी थोरपणा ॥२॥ मार्गीचे जन लोक सामोरे धांवती । लोटांगणी येती चांगदेवा ॥३॥ नानावस्त्रें भेटी सिध्द सामग्रिया । समर्पोनी पायां नमस्कारिती ॥४॥ याचेनि दर्शनें जडजीवां उध्दार । करिती जयजयकार नामघोषें ॥५॥ आले पुण्यस्तंभा श्रीगोंदें सन्निध । केला तीर्थविधी स्नान संध्या ॥६॥ व्दिज संतर्पणें वांटियेलीं दाने । पुढारी गमनें आरंभिलीं ॥७॥ आळेखिंडीवरुनि चालियेले भार । केले नमस्कार म्हैसीपुत्रा ॥८॥ केंदुरावरुनि उतरले घाट । गर्जती उध्दट सिध्दनामें ॥९॥ कान्होपाठक प्रीतीं चालविले सवें । प्रार्थुनी चांगदेवें अत्यादरें ॥१०॥ आले भीमातीरीं स्नानीं स्थिरावले । पुढें पाठविलें सांगोनियां ॥११॥ यावरी म्हणे निळा होईल सिध्दभेटी । परस्परें ते गोमटी आहे कथा ॥१२॥ बहुत अपूर्व असमाई चरित्र । परिसोत सर्वत्र श्रोतेजन ॥१३॥ ॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनंनाम चतुर्थ प्रकरणं समाप्तम् ॥