भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिरवी अंगीं अवतार लेणीं । विराजित कीर्ति भूषणीं । मुगुट कंडले कोटी तरणीं । तैसे तेज बंबाळ

miravi angin avatar lenin | virajit kirti bhushanin | mugut kandale koti taranin | taise tej bambal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मिरवी अंगीं अवतार लेणीं । विराजित कीर्ति भूषणीं । मुगुट कंडले कोटी तरणीं । तैसे तेज बंबाळ ॥१॥ कंठी शोभ्ला कौस्तुभमणि । पदकीं चरित्र रत्नाच्या खेवणीं । बाहुभूषणें दिव्याभरणीं । जडित कंकणेसुशोभित ॥२॥ भक्तस्तवनाच्या सुमनमाळा । वेदमर्यादा कटीं मेखळा । शास्त्रे वसनें सोनसळा । पुराणें ठसे उमटले ॥३॥ शंख चक्र पद्म गदा । शोभल्या भुजा त्या सायुधा । असुरमर्दनी झळकती सदा । मोक्षदानी वैरियां ॥४॥ संतसनकादिक उदरवासी । भरला आनंद सावकासी । नाभिकमळ प्रजापतीसी । ठाव दिधला अखंड ॥५॥ लक्ष्मी अर्धागीं विराजली । चरण सेवितां निमग्न झाली । तोडर दानवांचा शिसाळीं । वामनचरणीं रुळतसे ॥६॥ गगां वामांगुष्ठिहुनी । जन्मली उध्दरावया अवनी । महादोषांची करीत धुनी । चालिली पूर्व समुद्रा ॥७॥ सकळ देवांचे समुदाये । सिध्दही येती वंदिती पाये । नारद कीर्तनीं उभा ठाये । नृत्य करी स्वानंदें ॥८॥ निळा म्हणे उदार ऐसा । भक्तचकोरा चंद्रमा जैसा । पुंडिलिकाच्या भावासारिसा । विटे उभा ठाकला ॥९॥