भजनी मालिका
← भजनांकडे परत

मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं

malayanil shitalu palavi naye galun

मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं । सुमनाचा परिमळु गुंफ़िता नये ॥१॥ तैसा जाणा सर्वेश्वरु म्हणों नये सान थोरु । याच्या स्वरुपाचा निर्धारु कवण जाणें ॥२॥ मोतियाचें पाणी भरुं नये वो रांजणीं । गगनासी गवसणी घालितां नये ॥३॥ कापुराचें कांडण काढितां नये आड कण । साखरेचे गोडपण पाखडतां नये ॥४॥ डोळियांतील बाहुली करुं नये वेगळी । धांवोनि अचळीं धरितां नये ॥५॥ विठ्ठलरखुमाईचे भांडणीं कोण करी बुझावणी । तया विठ्ठल चरणीं शरण ज्ञानदेवो ॥६॥