भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग पाचारुनियां प्रांतवासी । व्दिज आणिले भोजनासी । जिताणें करुनियां श्रीकृष्णासी । ओंवाळिती अक्षवाणें

mag pacharuniyan prantavasi | vdij anile bhojanasi | jitanen karuniyan shrikrushnasi | onvaliti akshavanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग पाचारुनियां प्रांतवासी । व्दिज आणिले भोजनासी । जिताणें करुनियां श्रीकृष्णासी । ओंवाळिती अक्षवाणें ॥१॥ काळया सर्प स्थपिला वरी । कळंबातळीं यमुने तिरीं । देखोनि सोहळा तो नरनारी । करितीं आश्चर्य मानसीं ॥२॥ पहा रे हें श्रीकृष्णचरित्र । एकाहुनि एक विचित्र । नवलचि देखती आमुचें नेत्र । नित्यानित्य नूतन ॥३॥ हेचि घरोघरीं वार्ता । कथिती कृष्णचरित्र कथा । गुढीया उभवूनीयां चित्ता । माजी हर्ष न समाय ॥४॥ गाती नित्य नामावळी । तुळसी वृंदावना बैसोनि पाळी । अवलोकूनियां मुर्ति सावळी । करिती जिवें कुरवंडिया ॥५॥ म्हणती आमुचें थोर भाग्य । भाग्यें जोडला हा श्रीरंग । याचा नित्य घडतां संग । काय करावें वैकुंठ ॥६॥ निळा म्हणे उत्साह ऐसा । मानूनियां निज मानसा । करिती पूजा स्तविती ईशा । जगत्रयाच्या श्रीकृष्णा ॥७॥