भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग धांवोनियां यशोदा । हदयी आळंगी गोविंदा । बारे तूंतें अरिष्टेंचि सदा । जैं पासुनि जन्मलासी

mag dhanvoniyan yashoda | hadayi alangi govinda | bare tunten arishtenchi sada | jain pasuni janmalasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग धांवोनियां यशोदा । हदयी आळंगी गोविंदा । बारे तूंतें अरिष्टेंचि सदा । जैं पासुनि जन्मलासी ॥१॥ प्रथम पूतनेचा घात । दुजा भटाचा विपरीतार्थ । तिजा कागाचा हा अनर्थ । आम्हीं देखिला समस्ती ॥२॥ यावरी काय काय होईल । नकळे आम्हांते तें पुढील । मागें शकटाचेंहि नवल । मारिलेचि होतें तुज कृष्णा ॥३॥ कैसें रासचि पुसती । नानापरींचे उत्पात येती । काय करुं रे श्रीपती । कैसा वांचसील काय जाण ॥४॥ किती चिंता करुं खेद । मज हें न देखवती प्रमाद । तंव गगनवाणीचे शब्द । ऐकती झाली निज कर्णी ॥५॥ परमात्मा हा पूर्ण अवतार । उतरावया धराभार । तुझियें उदरींचा कुमर । निवटील असुर अपरिमित ॥६॥ जे जे पापी अतुर्बळी । आहेत हे भूमंडळी । तितुकियांसिहि मांडुनी कळी । पाठविल त्या यमपंथें ॥७॥ निळा म्हणे ऐकोनि कानीं । यशोदा संतोषली मनीं । टाळी पिटिली सकळही जनीं । थोर आश्चर्य वाटलें ॥८॥