भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुवळई मर्दूनियां उन्मत्त । उपटूनियां घेतले त्यांचे दांत । बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे

kuvalai marduniyan unmatta | upatuniyan ghetale tyanche dant | baliram ani krushnanath | ananden nachat ranasaure

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कुवळई मर्दूनियां उन्मत्त । उपटूनियां घेतले त्यांचे दांत । बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे ॥१॥ दोघेहि बंधु अति सुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । हे देखोनियां महावीर । मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥ ते रायाचे परम आप्त । आतुर्बळी बळ प्रताप । जयां देखतांचि आहाकंप । देवां दैत्या मनवां ॥३॥ दंडी मुडपी उरीं शिरीं । अदभुत बळाची उजरी । काळासम तुल्य ते निशाचरीं । जेठिया वस्ताद मल्लाचे ॥४॥ तयाचिये दृष्टीपुढें । मेरुमांदार भासती खडे । मल्लविधेमाजी निधडे । वीर उन्नत शिघ्रकोपी ॥५॥ जयाचा सदा आडदरा । समुद्रवलयांकिता वीरा । धाकें त्याचिया कंसापुरा । देती करभार सर्वही नृप ॥६॥ निळा म्हणे ते आग्रगण । जेठियांमाजी शिरोरत्न । भुजा दंडांतें थोपटून । राहिले उठोन पुढें उभे ॥७॥