भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण बळियामाजि बलिष्ट । कृष्ण अवघियां देवां श्रेष्ठ । तैसाचि बळिरामही उध्दट । भरील घोट देखतां

krushna baliyamaji balishta | krushna avaghiyan devan shreshtha | taisachi baliramahi udhdat | bharil ghot dekhatan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृष्ण बळियामाजि बलिष्ट । कृष्ण अवघियां देवां श्रेष्ठ । तैसाचि बळिरामही उध्दट । भरील घोट देखतां ॥१॥ एक नवनागसहस्त्रबळीं । दुजा तंव ते कल्पांत शुळी । येतांचि येथें निमिष मेळीं । करितील संहार कंसाचा ॥२॥ कृष्ण परमात्मा ईश्वर । अनंतकोटीब्रम्हांडधर । मायानियंता परात्पर । तया हा पामर आणवितो ॥३॥ पतंगा वडवानळेसीं खेळणें । दर्दुर शेंषातें गिळूं म्हणे । उलुकें रवितें संघटणें । केंवि जीवे प्राणी वांचिजेल ॥४॥ तैसिचि परी झाली यातें । जेंवि खदयोत झगटूं पाहे रवितें । अरण्यमृगें शार्दूलातें । कैसेनि भेटीसी आणिजे ॥५॥ परी येथें प्रारब्धचि बळी । घडवील घडावें तें तत्काळीं । पहा त्या हिरण्यकश्यपें आपुलियेचि नळीं । बसविला नृसिंह पाचारुनी ॥६॥ निळा म्हणे होणार होईल । बुध्दीही तैसीच प्रवर्तवील । क्रियाहि शरीरीं उमटेल । भोगणें भोगवील प्राचीन ॥७॥