भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पना वृक्षासी देखिलें । चिंतामणीस चिंतिलें

kalpana vrukshasi dekhilen | chintamanis chintilen

कल्पना वृक्षासी देखिलें । चिंतामणीस चिंतिलें । कामधेनुसी आपेक्षिलें । जीण्या जिवविलें तेंचि हरिरुप पंढरिये ॥१॥ धन्य कुळ धन्य जन्म । जयासि पंढरीचा नेम । चित्तीं अखंड विठ्ठल प्रेम । ते धन्य भक्त भूमंडळी ॥ध्रु०॥ तोचि तीर्थरुप सदा । तया दोष न बाधिती कदां । जो रातला परमानंदा । तेथें सर्व सिध्दि वोळंगती ॥२॥ ऐशीं वेदशास्त्रीं पुराणीं । जो रातला नामस्मरणीं । धन्य तया तीर्थ पर्वणी । धन्य वाणी तयाची ॥३॥ पंढरीसी कीर्तन करी । पुंडलिकासी नमस्कारी । विठ्ठल चरण अंतरी धरी । धन्य जन्म तयाचा ॥४॥ सकळ कुळाचा तारकु । तोचि जाणावा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगला निशंकु । धन्य जन्म तयाचा ॥५॥ त्यासी अंतीं वैकुंठप्राप्ती । ऐसें शुकें सांगितलें परीक्षिती । जे जे हरिचरणीं भजती । ते ते पावती वैकुंठ ॥६॥ मानें स्फ़ुंदत नाचत रंगणीं । प्रेम विठ्ठल चरणीं । सर्व सुख खाणी । बाप रखुमादेवीवर विठ्ठल ॥७॥