भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें नव्हे आजिकालिचें । युगां अठ्ठाविसांचें

hen navhe ajikalichen | yugan aththavisanchen

हें नव्हे आजिकालिचें । युगां अठ्ठाविसांचें । मज निर्धारितां साचें ।हा मृत्युलोकुचि नव्हे ॥ हाचि मानिरे निर्ध्दारु । येर सांडिरे विचारु । जरी तूं पाहासि परात्परु । तरि तूं जारे पंढरिये ॥१॥ बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी । भक्त पुंडलिकाचे द्वारीं । कर कटावरी राहिला ॥ध्रु०॥ काशी अयोध्या आवंति कांति । मथुरा माया गोमती । ऐशीं तीर्थे इत्यादि आहेति । परि सरी न पवती पांडुरंगी ॥२॥ हाचि मानिपारे विश्वासु । येर सांडिरे हव्यासु । जरि तूं पाहासि वैकुंठवासु । तरि तूं जाये पंढरिये ॥३॥ आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा । पैल थडीय परमात्मा । मध्य राहिला पुंडलिकु ॥४॥ या तिहींचें दरुशन । प्राण्या नाहीं जन्ममरण । पुनरपि आगमन येथें बोलिलेंचि नाहीं ॥५॥ पंढरपुरी ह्मणिजे भूवैकुंठ । ब्रह्म तंव उभेचि दिसताहे नीट । या हरिदासासी वाळुवंट । जागरणासी दीधलें । म्हणोनि करा करारे क्षीरापति । नटा नटा कीर्तनवृत्ती । ते नर मोक्षातें पावती । ऐसें बोलती सुरनर ॥६॥ हें चोविसा मूर्तींचें उध्दरण । शिवसहस्त्रनामासी गहन । हेंचि हरिहराचें चिंतन । विश्ववंद्य हे मूर्तितें । तो हा देवादि देव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा । बापरखुमादेवीवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा ॥७॥