भजनी मालिका
← भजनांकडे परत

हे देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ । केलें तुवां वृषभेंसी

he dekhoniyan goval | ale dhavoniyan sakal | krushnasi mhanati yudhda tumbal | kelen tuvan vrushabhensi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हे देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥ आम्ही देखिलें दुरोनी । होतो डोंगरीं बसोनी । तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥ येरु म्हणे तो असुर । तुम्हां भासला होता ढोर । कंसरायाचा तो हेर । जाता वधुनी सकळांते ॥३॥ ऐसा जाणोनियां निभ्रांता । शांति पावविला तो आतां । तुम्ही भयातें न धरितां । सुखे विचारा मत्संगें ॥४॥ माझिया भजनीं जे राहाती । त्यांचिया विघ्नाची शांती । करुनियां सुखविश्रांती । तया अर्पी सर्व सिध्दी ॥५॥ ऐसें ऐकोनियां हरिवचन । संतोषले सकळी जन । मग नमस्कारुनियां उभय चरण । गोकुळांप्रती चालिले ॥६॥ निळा म्हणे सांगती वडिलां । वनीं वर्तमान जो देखिला । धेनकासुर तो निपातिला । आजी कृष्णें युध्दसंधी ॥७॥