भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोधनें घेउनी गोपाळ आले । छायेसी बैसले कळंबाचिये

godhanen gheuni gopal ale | chhayesi baisale kalambachiye

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोधनें घेउनी गोपाळ आले । छायेसी बैसले कळंबाचिये ॥१॥ आतां म्हणे मांडा खेळ । गोमटी हे वेळ सांपडली ॥२॥ तंव कृष्ण म्हणती आधीं जेवा । रुचेल बरवा खेळ मग ॥३॥ पोटांत भुक सुकलें मुख । कोण ते सुख खेळायाचें ॥४॥ कोणा कैसा पाहोंदया दिठी । यारे सोडा गांठी शिदोरियाच्या ॥५॥ सोडितां सिदोया दाविती अवघे । तंव एका ऐशी नव्हे एकापरी ॥६॥ अरुष एक ते बोलताती बोल । परी अर्थ सखोल विचारतां ॥७॥ आधीं माझा घास भरी । मग मी श्रीहरी घेईन तुझा ॥८॥ कान्हा म्हणे ऐका रे वोजा । आधीं तुम्ही माझा घांस भरा ॥९॥ गोपाळ म्हणती शेवट गोड । पुरवीं आधीं कोड आमुचा घेई ॥१०॥ घाटा घुगया कोरडया भाकरी । एकाची शिदोरी शिळीपाकी ॥११॥ कढण काला कालविलें ताक । एकाचा साजूक दहींभात ॥१२॥ एक ते म्हणती आमुचें अंगिकारीं । मुखीं घांस भरी टाकूं नको ॥१३॥ चांगले कोणाचें आणावें गोपाळा । आमुचा हा दुबळा संसार ॥१४॥ तंव कान्हा म्हणे आईका रे गडे । तुमचेंचि आवडे घाला मुखीं ॥१५॥ तुमचीये हातींचें भाजीदेठपान । तें आम्हां समान पंचामृता ॥१६॥ आणखी अर्पिती उपाधी जाणिवा । विकृती त्यांचिया भावा देखोनि मज ॥१७॥ सर्व भावें आम्हां हेंचि गोड लागे । दांभिका न लगे भेदकांचे ॥१८॥ मिटक्या देऊनियां स्वीकारी श्रीरंग । मग म्हणे विभाग घ्यावा रे माझा ॥१९॥ ब्रम्हरस वरि नामाचें सिंचन । सेवा रे सज्जन सखें माझे ॥२०॥ जेऊनियां धाले गोविंदा पंगती । उध्दार ते देती स्वानुभवें ॥२१॥ धन्य तो सोहळा आनंदाचा खेळ । निळा म्हणे गोपाळ सांगती ज्यां ॥२२॥