भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत अवतार घेतलीं सोंगें

bahut avatar ghetalin songen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बहुत अवतार घेतलीं सोंगें । बहुतां भक्तांसी तारिलें मागें । बहुताचि शोभला बहुतां अंगे । बहुतां संगे क्रीडा केली ॥१॥ मासा कांसव डुक्कर झाला । नृसिंह वामन होउनी ठेला । भक्ताचें काजीं संकटे याला । बहुत अवगला अवगणिया ॥२॥ एके दिवशी गोधनामागें । अवघाचि गिळियला होता नागें । त्यातें चिरुनियां निघाला वेगें । वांचला भाग्यें गौळियांच्या ॥३॥ एकदां वोणवा गिळितुचि आला । गोवळे देखोनि धाकिती त्याला । पसरुनी मुख तो अवघाचि प्याला । विराट झाला स्वरुपी हा ॥४॥ वनामाजी ब्रम्हा चोरुनी आला । वत्सें गोवळे घेऊनी गेला । अंगे आपण तैसाचि झाला । मिरवत आला गोकुळांत ॥५॥ इंद्राचि पांजी आपनचि खाय । त्याचिया क्रोधें पाउसाचे भय । मग उचलूनी डोंगर तळीं त्या राहे । गोकुळासगट नाहीं भ्याला ॥६॥ चेंडुवाच्या मिसें बुडाला डोहीं । काळियाचि नाथुनी आणिला पाही । नाचती गोवळे वोसरल्या गाई । आनंदासी काई उणे तेथें ॥७॥ व्देषिया म्हणोनि मामा तेचि मारी । विश्वासी म्हणोनी पांडवा घरीं । आवडत्या म्हणोनी भोगिल्या नारी । लाघवी मुरारी खेळ खेळे ॥८॥ निळा म्हणे हा भक्तांसाठीं । नाना कचाटें सोसितो आटी । धरुनियां भावे बैसतां पोटीं । सोडवी संकटी स्वामी माझा ॥९॥