भजनी मालिका
← भजनांकडे परत

अश्वरुपिया केसासूर । ठाणमाण अति सुंदर । जैसा उच्चैश्रवा रहंवर । देवलोकीं इंद्राचा

ashvarupiya kesasur | thanaman ati sundar | jaisa uchchaishrava rahanvar | devalokin indracha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अश्वरुपिया केसासूर । ठाणमाण अति सुंदर । जैसा उच्चैश्रवा रहंवर । देवलोकीं इंद्राचा ॥१॥ शोभिवंत तयाहुनी आगळा । असुई अवलोकितां डोळा । पाहावाचि ऐसा वेळोवेळां । आठवों नेदी आणि ॥२॥ शोधितांही सप्तव्दीपांतरु । नाढळेचि कोठें ऐसा वारु । सुंदराहुनी अति सुंदरु । रुपें नागरु भुलवणा ॥३॥ दांडिमान कळाव्या डोळे । कर्ण जैसे केतकिदळें । गुडघे सुंब मेजागळे । सर्वहि शृंगारमंडीत ॥४॥ खोगिर जीन लगाम तोंडी । इलाखे रिकेबियांची जोडी । गाशा वागदोर दुमाचिया दांडी । खुरुस नवरत्न खचितांचे ॥५॥ तंव संवगडियांसी खेळत । आले अकस्मात गोपिनाथ् । वारु देखोनि गडिया म्हणत । पैल पहारे विचित्र तेजी ॥६॥ आम्हा राये कंसासुरें । बैसावया अति आदरें । धडिलें हें वहान खरें । अनुवादिजे गडियासी ॥७॥ आतां यावरी घालुनि स्वारी । पाहो बैसोनियां दुरी । बैसोनि पहावें गोपुरावरी । ऐसें सांगोनियां श्रीहरी । मग सांवरी आपणिया ॥९॥ आइता साज आहे वरी । रुपाकृत ही साजिरी । मायावी हा जाणेनियां हरी । कास कसिली बळकट ॥१०॥ निळा म्हणे मनोगत । आर्त केशियाचे उत्कंठित । वरी बैसलिया कृष्णनाथ । नेईन दिगांता उडवुनी ॥११॥