भजनी मालिका
← भजनांकडे परत

अलक्षलक्षीं मी लक्षीं

alakshalakshin mi lakshin

अलक्षलक्षीं मी लक्षीं । तेथें दिसती दोहीं पक्षी । वेदां शास्त्रां हे़ची साक्षी । चंद्रसूर्या सहित । मागेन स्वानुभवअंगुले । पांचा तत्त्वांचे सानुलें । व्यर्थ इंद्रिये भोगीलें । नाहीं रंगले संताचरणीं ॥१॥ बाळछंदो बाबा बाळ छंदो । रामकृष्ण नित्य उदो । ह्रदयकळिके भावभेदो । वृत्तिसहित शरीर निंदो । नित्य उदो तुझाची ॥२॥ क्षीरसिंधुही दुहिला । चतुर्दशरत्नीं भरला । नेघे तेथील साउला । मज अबोला प्रपंचेंसी । दानदेगा उदारश्रेष्ठा । परब्रह्म तूं वैकुंठा । मुक्ति मार्गीचा चोहटा । फ़ुकटा नेघे तया ॥३॥ पृथ्वीतळ राज्यमद । मी नेघे नेणें हेंही पद । रामकृष्ण वाचे गोविंद । हाची छंद तुझ्या पंथे । मंत्र तीर्थयज्ञयाग । या न करि भागा भाग । तूंचि होऊनि सर्वांग । सर्वासंग मज देई ॥४॥ वृत्ति सहित मज लपवी । माझें मन चरणीं ठेवी । निवृत्ति पदोंपदीं गोवीं तुं गोसावी दीनोध्दारण ॥ सात पांच तीन मेळा । या नेघे तत्त्वांचा सोहळा । रज तमाचा कंटाळा । ह्रदयीं जिव्हाळा हरि वसो ॥५॥ श्वेत पीत नेघे वस्त्र । ज्ञानविज्ञान नेघे शास्त्र । स्वर्ग मृत्यु पाताळपात्र । नित्य वस्त्र हरी देई । चंद्रसूर्य महेन्द्र पदें । ध्रुवादिकांची आनंदें । तें मी नेघे गा आल्हादें । तुझ्या ब्रिदें करीन घोष ॥६॥ करचरणेंसे इंद्रियवृत्ति । तुझ्या ठायीं तूंचि होती । मी माझी उरो नेदी कीर्ति । हें दान श्रीपति मज द्यावें । शांती दया क्षमा ऋध्दी । हेहि पाहातां मज उपाधी । तुझी या नामांची समाधी । कृपानिधी मज द्यावी ॥७॥ बापरखुमादेविवरु तुष्टला । दान घे घे म्हणोनि वोळला । अजानवृक्ष पाल्हाईला । मग बोलिला विठ्ठल हरी । पुंडलिके केलेरे कोडें । तें तुवां मागीतलेरे निवाडें । मीं तुज ह्रदयीं सांपडे । हे त्त्वां केलें ज्ञानदेवा ॥८॥