भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकार स्थूळ नाशिवंत

akar sthul nashivant

आकार स्थूळ नाशिवंत । हे तरी जाईल भूमि आंत । तयावरि हरि चालत । तेणें होईल कृतकृत्य ॥१॥ देहो जावो अथवा राहो पांडुरंगीं दृढ भावो ॥२॥ दुजा गुण आपीं मिळें । तरि मी होईन गंगाजळ । हरि अभिषेक अनुदिनीं । सुखें सर्वांगावरि खेळे ॥३॥ तिजा गुण तेजरुप । तरि मी होईन महादीप हरि रंगणी दीपमाळा । दीप उजळीन समीप ॥४॥ वायु व्यापक चौथा गुण । तरि मी विंजणा होईन । हरि अष्टांगे विनवी मना । ऐशा दृढ धरिन खुणा ॥५॥ आकाश पांचवा गुण । तरि मी प्रसादीं राहेन । बापरखुमादेविवरा अखंड तुझे अनुसंधान ॥६॥ निमीष नलगे मन वेधितां । येवढी तुझी स्वरुपता ॥१॥ विठोबा नेणों कैसी भेटी ॥ उरणें नाहीं जिवेसाठीं ॥२॥ उरणें उपाधि कारणें । तें तों नेमिलें दर्शनें ॥३॥ निवृत्तिदासा वेगळें । सांगावया नाहीं उरलें ॥४॥