भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्निसंस्कार देउनी त्यासी । संपादिलें उत्तर विधीसी । मग निजगजरें उग्रसेनासी । स्थापिलें राज्य सिंहासनीं

agnisanskar deuni tyasi | sampadilen uttar vidhisi | mag nijagajaren ugrasenasi | sthapilen rajya sinhasanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अग्निसंस्कार देउनी त्यासी । संपादिलें उत्तर विधीसी । मग निजगजरें उग्रसेनासी । स्थापिलें राज्य सिंहासनीं ॥१॥ नवाचि ध्वज नवें छत्र । व्दाहीं फिरविली सर्वत्र । साखरा वांटूनियां नगरांत । केले दानपात्र परमसुखी ॥२॥ रायाचे पूर्वील जे प्रधान । सन्मानिले ते गौरऊन । प्रजेसी सिरपाव देऊन । अधिकारी जन सुखी केले ॥३॥ यावरी मातापिता बंदिखानीं होतीं त्या बाहेरी काढुनी । वादयें लावूनी मंगलस्नानीं । बरव्या प्रकारीं पूजिलीं ॥४॥ वस्त्रे अलंकारें गौरविलीं । निजमंदिरातें अणियेलीं । सिबिका यानीं बैसविलीं । घोषगजरें मिरवित ॥५॥ तये काळींचा तो आनंद । सांगावया मी मतिमंद । जेथें परमात्मा गोविंद । संतोषवित मातांपिता ॥६॥ निळा म्हणे बोबडया बोली । हरिची कीर्ति हे वाखाणिली । संती पाहिजे उपसाहिली । नेणतें लडिवाळ म्हणोनियां ॥७॥