भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्नीची व्हावया शांती । उपाय आहे तुमच्याचि हातीं । लावोनियां बैसा पातीं । डोळेचि झांकुनी बळकट

agnichi vhavaya shanti | upay ahe tumachyachi hatin | lavoniyan baisa patin | dolechi jhankuni balakat

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अग्नीची व्हावया शांती । उपाय आहे तुमच्याचि हातीं । लावोनियां बैसा पातीं । डोळेचि झांकुनी बळकट ॥१॥ उघडे ठेवितां चेतले वन्हीं । मग तो नाटोपे आम्हां लागुनी । सांडील अवघीयांसीच जाळुनी । झांका म्हणउनी निज नेत्र ॥२॥ गोवळ म्हणती कैसे डोळे । झांकउनी मारवितोसी रे सकळे । येरु म्हणे तुम्हां हें नकळे । तोटका या काळें ऐसाची ॥३॥ येथें न धरितांचि विश्वास । जळाल अवघेही नि:षेश । ऐसें सांगोनिया त्यांस । डोळे निज करें धरविले ॥४॥ मग आपण वाढोनियां श्रीहरी । जाहला विराटरुपिया गगनावरीं । मुख पसरोनियां श्वासेंची करी । वोढिल्या अग्निज्वाळा ॥५॥ पोटीं घालूनियां दावानळ । जाहला पहिल्याचि ऐसा गोपाळ । हें देखोनी अवघेची गोंवळ । बोटांसंघीं लक्षितां ॥६॥ तयां म्हणे उघडा नेत्र । ऐकोनी बोलती ते सर्वत्र । म्हणती देखिलें हें चरित्र । तूंचि गगनवरी वाढलासी ॥७॥ निजमुखें गिळिलें ज्वाळ । तूंचि तूं काळाचाहि काळ ॥ आजी देखिला तुझा खेळ । आम्हीं आपुल्या निजदृष्टीं ॥८॥ निळा म्हणे बोलोनी ऐसें । लोळतीं पायावरी उल्हासें । मनीं जाणोनियां विश्रवासें । हाचि परमात्मा ईश्वर ॥९॥