भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजवरी दृष्टी कृपेची ओतिली

majavari drushti krupechi otili

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
मजवरी दृष्टी कृपेची ओतिली । प्रेमाची गुंतली माय जैसी ॥ १ ॥ अंतरींची पूजा घेऊनी जयराम । गेला तो सप्रेम स्वस्थाना ॥ २ ॥ उगाची बैसला आसनीं समस्त । करोनियां स्वस्थ चित्तवृत्ति ॥ ३ ॥ तव कांहीं एक अपूर्व वर्तलें । तुकारामें दिलें दर्शनासी ॥ ४ ॥ केला नमस्कार भेटुनी आनंदें । अत्यंत आल्हादें स्वामी सखा ॥ ५ ॥ मजही दर्शन दिधलें अळुमाळ । घातला कवळ मुखामाजीं ॥ ६ ॥ मज म्हणे आलों जयराम भेटीसी । तुजही मानसीं ओळखिलें ॥ ७ ॥ तुम्ही आतां येथें नको राहों कदा । आत्मज्ञानबोधा न संडी वो ॥ ८ ॥ बहिणी म्हणे दर्शन दुसरें । मनाच्या व्यापारें तुकोबाचें ॥ ९ ॥