भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदिनाथें उपदेश पार्वतीस केला

adinathen upadesh parvatis kela

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
आदिनाथें उपदेश पार्वतीस केला । मत्स्येंद्रें ऐकिला मच्छगर्भी ॥ १ ॥ शिवह्रदयींचा मंत्र पैं अगाध । जालासे प्रसिद्ध भक्तियोगें ॥ २ ॥ तेणें त्या गोरक्षा केलें कृपादान । तेथोनी प्रकट जाण गहिनीप्रती ॥ ३ ॥ गहिनीनें दया केली निवृत्तिनाथा । बाळक असतां योगरूप ॥ ४ ॥ तेथोनि ज्ञानेश पावले प्रसाद । जाले ते प्रसिद्ध सिद्धासनीं ॥ ५ ॥ ‘सच्चिदानंद बाबा’ भक्तीचा आगरू । त्यासी अभयवरू ‘ज्ञाने’ केला ॥ ६ ॥ पुढें विश्वंभर शिवरूप सुंदर । तेणें राघवीं विचार ठेविलासे ॥ ७ ॥ केशव चैतन्य बाबाजी चैतन्य । झालेसे प्रसन्न ‘तुकोबासी’ ॥ ८ ॥ एकनिष्ठ भाव तुकोबा-चरणीं । म्हणोनी ‘बहिणी’ लाधलीसे ॥ ९ ॥