भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयराम समर्थ ज्ञानाचा सागर

jayaram samartha dnyanacha sagar

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
जयराम समर्थ ज्ञानाचा सागर । साक्ष तें अंतर त्याचें तया ॥ १ ॥ बोलाविलें तेणें हिरंभटाप्रती । माझी तया स्थिती पुसीयेली ॥ २ ॥ सांगितला तेणें वृत्तान्त सर्वही । वर्तला जो कांहीं गृहीं त्याचें ॥ ३ ॥ स्वप्नागत गुरु तुकोबाचे रूपें । स्वप्नींचिये कृपें बोध केला ॥ ४ ॥ सावध होउनी ते मुली बैसली । गायीस गौरविली कुर्वाळूनी ॥ ५ ॥ दुग्ध दोहोनिया घेतलें तियेनें । पाणी आणी तृणें भक्षीतसे ॥ ६ ॥ परी तें मुलीचें रूप पालटलें । पूर्ण तें दाटलें ह्रदय तिचें ॥ ७ ॥ तुकोबाचा छंद अंतरीं लागला । मायबापें तिला सांगताती ॥ ८ ॥ भ्रतार हा तिचा वेडावला राहे । उगाची तो पाहे तियेकडे ॥ ९ ॥ छांदिष्टा होउनी बैसली घरांत । तुकोबासी चित्त लावुनीया ॥ १० ॥ ऐसा हा वृत्तांत हिरंभट सांगे । जयराम निजांगे संतोषला ॥ ११ ॥ बहिणी म्हणे ऐसा निर्धार ऐकोनी । जयराम स्वामींनीं कृपा केली ॥ १२ ॥