भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें

jalen samadhan brahmanachya shabden

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें । स्वप्नामाजीं पदें आठविती ॥ १ ॥ परी अंतरींच तुकोबाचें ध्यान । दर्शनावांचोन करितसें ॥ २ ॥ जयाचिया पदें होतसे विश्रांती । तेचि देहाकृति विठ्ठलाची ॥ ३ ॥ विठ्ठलासी तया नाहीं भेदभाव । ऐसे माझें मन साक्ष आहे ॥ ४ ॥ पांडुरंग तुका पांडुरंग तुका । वेगळीक देखा होय केवीं ॥ ५ ॥ कलियुगीं बौद्धरूप धरी हरी । तुकोबा शरीरीं प्रवेशला ॥ ६ ॥ तुकोबाची बुद्धि पांडुरंग रूप । मन तें स्वरूप तुकोबाचें ॥ ७ ॥ तुकोबाचे सर्व इंद्रियचालक । पांडुरंग देख सत्य आहे ॥ ८ ॥ तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग । श्रोतृ ते अभंगरूप त्याचे ॥ ९ ॥ तुकोबाचे हात लिहिताती जें जें । तेंचि तें सहजें पांडुरंग ॥ १० ॥ सर्वही व्यापार तुकोबाचे हरी । आपणचि करी अद्वयत्वें ॥ ११ ॥ बहिणी म्हणे रूपें व्यापक ‘तुका’ वा । ध्यान माझ्या जीवा हेंचि पाहे ॥ १२ ॥